बाळगुटी कशी द्यावी
मुलांच्या आरोग्यासाठी'बाळकडू' या नावाने ओळखला जाणारा औषधांचा गट खूप उपयोगी पडतो. या गटात कडू आणि तिखट चवीची औषधे असतात. हे पदार्थ पाण्यात उगाळून बाळाला दोन वेळा चाटवले जातात. अशी औषधे परंपरेने घराघरांतून चालत आली आहेत.
१) बाळघुटीमध्ये वेखंड, बाळहिरडे,हळकुंड, काकडशिंगी, बेहडा,मुरुडशेंग, जायफळ, चिंचोका,खारीक, बदाम यांसारखे घटक असतात.
२) ही औषधे टिकाऊ स्वरूपात ठेवता येतात. ही औषधे सहाणेवर उगाळून त्यांचे सूक्ष्म अंश बाळाला रोज चाटवता येतात.
३) बाळाची छाती कफाने भरत असल्यास वेखंड वापरावे. स्वच्छ दगडावर मध (एक चमचा) टाकून वेखंडाची कांडी त्यात उगाळून तयार करावे. हे चाटण बाळास चाटवल्यास बाळाला चिकट फेसकट उलटी होऊन छातीतील फेसकटपणा कमी होतो.
४) छाती भरत असेल तर वेखंड व काकडशिंगी उगाळणे किंचित वाढवावे. कधीकधी बाळाला शी होताना खडा झाल्याने कुंथावे लागते. यासाठी रोजच्या उगाळण्यामध्ये बाळहिरडा अधिक उगाळावा व चिंचोका उगाळू नये.
५) बाळाला पातळ शी होत असल्यास खारीक, बदाम बाळहिरडा कमी करून किंवा वगळून जायफळ, चिंचोका, यांचे उगाळणे अधिक करून चाटण द्यावे.
६) पोटात दुखण्यामुळे पोटाकडे हात नेऊन बाळ थांबून थांबून रडते. असे असेल तर मुरुडशेंग अधिक उगाळावी; जायफळ, चिंचोके, बदाम हे उगाळू नयेत.
७) लहान मुलांना जुलाब, शी चे खडे, छाती भरणे, यांसारखे अनेक त्रास होत असतात. यासाठी सूक्ष्म प्रमाणात दिलेल्या औषधांनी वेळीच सुधारणा घडवता येते.