काकडशिंगी हेही एक बहुगुणी औषध आहे. अडकलेला कफ काढणारे, तसेच दमा बरे करणारे, श्वासनलिकेची दुखणी बरी करणारे, दात येताना होणारा खोकला बरा करणारे, ज्वरनाश करणारे असे हे औषध आहे.
सुजाता गानू
लहान मुलांच्या औषधात काकडशिंगी ही लोकप्रिय आहे. ती फार प्रमाणात वापरतात.
लहान मुलांच्या खोकल्यात - लहान मुलांना खोकला झाला तर काकडशिंगीचे चूर्ण 125 मिलि ग्रॅम मधातून चाटवावे. लहान मुलांना झालेला खोकला ताबडतोब बरा होतो.
लहान मुलांना हगवण लागली तर - लहान मुलांच्या हगवणीवरही काकडशिंगीचे चूर्ण अत्यंत उपयुक्त आहे. ते मधातून चाटवावे. त्याने हगवण तत्काळ बरी होते.
लहान मुलांच्या तापावर - कोणत्याही प्रकारचा ताप लगेच बरा हाईल जर अर्धा ग्रॅम अतिविषाची कळी व काकडशिंगी यांचे चूर्ण अर्धा ग्रॅम मधाबरोबर चाटवले तर.
लहान मुलांची रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यासाठी - लहान मुलांना रोग होऊ नये व त्यांची प्रतिकारकशक्ती वाढावी म्हणून अतिविष, नागरमोथा व काकडशिंगी या आयुर्वेदीय वनस्पतींचे समभाग घेऊन वस्त्रगाळ चूर्ण करावे. कुटून चांगले वस्त्रगाळ केलेले चूर्ण बालकांना मधातून देण्याचा प्रघात आहे. हे चूर्ण रोज लहान मुलास बालगुटी म्हणून द्यावे.
बाळाचे दात येताना त्रास होऊ नये म्हणून -अतिविष, नागरमोथा व काकडशिंगी यांचे मिश्रण चांगले मधात घोळून बाळाला चाटवले असता बाळाचे दात येताना त्याला हलके जाते दात येताना सर्दी, खोकला, हगवण, ताप यासारखा काहीही त्रास होत नाही. अशाप्रकारे काकडशिंगी ही खास बाळाचे आरोग्य जतन करणारी वनौषधी आहे